अतिवृष्टी अनुदानात दूजाभाव करणाऱ्या ग्रामसेवक व तलाठी निलंबित करा* *लांबोटीचे वीज शाखा अभियंत्यावरही कारवाई करा* *मोहोळचे पंढरपूरचे आ राजू खरे यांची अधिवेशनात मागणी

चळे प्रतिनिधी
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे व अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला होता. या कालावधीत तालुक्यातील काही गावांमध्ये तलाठी व ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्तांऐवजी ज्यांचे काहीही नुकसान झाले नाही, अशांना शासनाची मदत मिळवून दिली असून याची चौकशी होऊन त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी आमदार राजू खरे यांनी विधानसभेत केली.
293 अन्वये विधानसभेत या विषयावर चर्चा झाली. यावेळी बोलताना आमदार खरे म्हणाले, शंभर वर्षाच्या इतिहासात असा कधीही पूर मोहोळ तालुक्यात आला नव्हता. पूर व अतिवृष्टीचा फटका तालुक्यातील 50 ते 60 गावांना बसला आहे. सरकारने नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले याचे आपण स्वागत करतो. मात्र काही सरकारी बाबूंनी शासनाची दिशाभूल केली आहे.
मोहोळ तालुक्यातील तरडगाव, विरवडे बुद्रुक, शिंगोली, पीर टाकळी, शेरेगाव, लांबोटी , गुंजेगाव , नांदगाव या गावांमध्ये नुकसानग्रस्तांऐवजी ज्यांच्या घराला पाणीच लागले नाही अथवा ज्यांच्या शेतात पाणी शिरले नाही, अशा लोकांचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे प्रकार तेथील तलाठी व ग्रामसेवक यांनी केले आहेत. यामुळे नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या शासनाच्या हेतूला येथे धक्का पोहोचला आहे. तरी या तलाठी व ग्रामसेवकांचे निलंबन करावे. तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत मिळावी. तसेच लांबोटी येथील वीज कंपनीचे शाखा अभियंता हे डीपी बदलून देण्यासाठी पैशाची मागणी करत आहेत. त्यांची ही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी आमदार खरे यांनी केली. नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती नंतर अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. नवीन पीकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना पाणी वीज यांची गरज आहे. अशावेळी शेतकऱ्यांना डीपी बदलून घेण्यासाठी पैसे मागितले जाणे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. यासाठी या वीज अभियंत्याची चौकशी करून तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.
सभागृहात बोलताना आमदार खरे म्हणाले, पूरस्थितीचा फटका तालुक्यातील पाच मंडळांना बसला होता तर अतिवृष्टीमुळे सर्वच नऊ महसूल्यमंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आपण सोलापूर जिल्हाधिकारी यांना उर्वरित चार मंडळांना अतिवृष्टीग्रस्त यादीतज घेऊन मदतीची मागणी केली होती. मात्र काही नियमांमुळे त्यांनी असमर्थता दर्शवली. यानंतर आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चार मंडळांचा समावेश अतिवृष्टीग्रस्त यादीत करण्याची मागणी केली असता त्यांनी याबाबत सहकार्य केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी आपण शासनाचे आभार मानतो.
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मोहोळ तालुक्यातील रस्ते हे खराब झाले असून ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी त्यांनी या चर्चेदरम्यान बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केले. यावेळी आमदार खरे यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन नुकसानग्रस्त भागाचा विचार करून मदत दिली जावी अशी आग्रही मागणी मांडली
No comments:
Post a Comment