चळे प्रतिनिधी -२५ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातून परतताच कोणताही विलंब न लावता आ. राजू खरे यांनी तात्काळ खंडाळी, पापरी, येवती व देवडी या गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त शेती व फळबागांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकरी बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दौऱ्यादरम्यान द्राक्ष, केळी, मका, डाळिंब व शेवगा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहून मन अत्यंत व्यथित झाले. अनेक ठिकाणी द्राक्षबागा उद्ध्वस्त झालेल्या असून केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या या संकटामुळे हिरावून गेल्याची वेदना मनाला चटका लावणारी आहे. या कठीण प्रसंगी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा त्यांनी विश्वास दिला.
या पाहणी दौऱ्यात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश देत मदत प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे, असेही निर्देश दिले.

No comments:
Post a Comment