अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये मोहोळ तालुक्याचा समावेश करू नये यासाठी आ.राजू खरे आक्रमक, महसूल मंत्री बावनकुळे यांची घेतली भेट 

मोहोळ प्रतिनिधी :- पंढरपूर येथे मंजूर करण्यात आलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये मोहोळ तालुक्याचा समावेश करण्याबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे मा. महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मोहोळ तालुक्यातील जनतेच्या भावना, प्रशासकीय सोयी आणि वस्तुस्थिती त्यांच्यासमोर सविस्तर मांडली.

मोहोळ तालुक्याचे सर्व महसुली, प्रशासकीय, न्यायालयीन, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच दैनंदिन व्यवहार प्रामुख्याने सोलापूर शहराशी संबंधित आहेत. भौगोलिकदृष्ट्याही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय हे मोहोळ तालुक्यातील नागरिकांसाठी अधिक सोयीचे आहे. त्यामुळे मोहोळ तालुका पूर्ववत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्न राहावा, ही संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची तीव्र आणि रास्त भावना आहे.

याच पार्श्वभूमीवर मी मा. महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना सविस्तर निवेदन सादर करून मोहोळ तालुक्याचा पंढरपूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करू नये आणि तो पूर्ववत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम मागणी केली.

माझ्या निवेदनाची गंभीर दखल घेत मा. महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश जारी केले. तसेच दूरध्वनीद्वारे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून, मोहोळ तालुक्यातील लोकभावनेचा आदर करत मी मांडलेल्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच मोहोळ तालुका पूर्ववत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्न ठेवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्याचेही निर्देश दिले.

मा. महसूलमंत्री महोदयांनी या विषयाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहत लोकहिताला प्राधान्य दिल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

मोहोळ तालुक्यातील जनतेच्या हितासाठी, त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि लोकभावनेचा आदर राखण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही अविरत सुरू राहील. मोहोळ तालुक्याच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी शासनाच्या प्रत्येक स्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहणार असून, मोहोळच्या हिताशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही.असे आ. राजू खरे यांनी सांगितले आहे