मोहोळच्या रस्त्यांसाठी आमदार राजू खरे मैदानात; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून निधीचे निर्देश
चळे प्रतिनिधी दि. 20:- मोहोळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब रस्त्यांच्या प्रश्नाला आता शासनस्तरावर गती मिळण्याची शक्यता आहे. रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण आणि आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिल्याचे आमदार खरे यांनी सांगितले.
मोहोळ शहरातील विविध भागांसह तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनधारक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न शेतमालाच्या वाहतुकीशीही संबंधित असल्याने नागरिकांकडून रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मोहोळ शहर व तालुक्यातील रस्त्यांची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
या मागणीची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन मोहोळ शहर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना गती मिळाल्यास मोहोळ शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता शासनाकडून निधीची उपलब्धता आणि त्यानंतर प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामांना कधी सुरुवात होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण यापूर्वीही मोहोळ तालुक्यातील अनेक रस्त्यांना नीधी मंजूर झाल्याची जाहिरात बाजी केली होती. परंतु प्रत्यक्षात रस्त्यांचे काम मात्र सुरू नसल्याचे दिसून येत आहे.
मोहोळ मतदारसंघाच्या विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असून, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार राजू खरे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment