१५ वर्षांपासून शिक्षकांशी थेट संपर्क; पुणे विभागातील प्रत्येक शाळा आणि शिक्षक मतदारांशी जिव्हाळ्याचे चळे प्र चळे प्रतिनिधी:
पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी आमदार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अधिकृत उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सातत्याने दौरे करून शिक्षकांशी थेट संपर्क ठेवला आहे. प्रत्येक शाळेला भेट देत शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्याची त्यांची कार्यपद्धती आणि सरळमार्गी स्वभाव यामुळे शिक्षक मतदारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला वेग आला असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
दत्तात्रय सावंत यांनी २०१४ मध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यापूर्वीच माध्यमिक शाळा कृती समितीच्या माध्यमातून तीन ते चार वर्षे तयारी केली होती. या काळात त्यांनी पुणे विभागातील विविध शाळांना भेटी देऊन शिक्षक मतदारांशी संवाद साधला. सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबतची तळमळ यामुळे त्यांच्या उमेदवारीची चर्चा संपूर्ण विभागात सुरू झाली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त केली.
आमदारपदाच्या कार्यकाळात शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याच कामाच्या जोरावर त्यांनी २०२० मध्ये पुन्हा निवडणूक लढविली. मागील निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुमारे चार हजार मतांची वाढ होऊनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवातून धडा घेत त्यांनी संघटनात्मक पातळीवर आवश्यक बदल केले आणि शिक्षकांशी असलेला संपर्क कायम ठेवला.
शिक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात
शिक्षक मतदारांच्या आग्रहाखातर दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवर ते निवडणूक लढवत असून, त्यांच्या दीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.
गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ शिक्षकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी थेट संपर्काचे नाते जपले आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील शाळा, तेथील शिक्षक आणि त्यांच्या समस्या यांची त्यांना जवळून माहिती आहे. त्यामुळे प्रचारासाठी शिक्षकांपर्यंत पोहोचताना त्यांना या अनुभवाचा फायदा होत असल्याचे चित्र दिसत आहे.
शिक्षक मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष
या निवडणुकीत शिक्षक मतदारांनी स्वतः प्रचाराची धुरा हाती घेतल्याचे दिसत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या आणि त्यांच्या अडचणी समजून घेणाऱ्या प्रतिनिधीला संधी मिळावी, अशी भूमिका काही शिक्षक मतदारांकडून मांडली जात आहे. राजकीय हस्तक्षेपापेक्षा शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व निवडून आणण्यासाठी मतदारांकडून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
एकीकडे अंतिम टप्प्यात पोहोचलेला प्रचार, तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून जोपासलेला शिक्षकांशी थेट संपर्क, या पार्श्वभूमीवर दत्तात्रय सावंत यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. आता शिक्षक मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण पुणे विभागाचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment